पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधने व सुरक्षेची काटेकोर आखणी करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून, यासाठी पोलीस प्रशासन व महापालिका यंत्रणेमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते मतमोजणी व निकाल जाहीर होईपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. शहरात एकूण ३२ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातून ४ सदस्य निवडले जाणार आहेत. यामुळे एकूण १२८ नगरसेवकांची संख्या निश्चित झाली आहे. यापैकी ५० टक्के म्हणजेच ६४ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या १७ लाख १७ हजार ६३१ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८१० असून अनुसूचित जमातींची लोकसंख्या ३६ हजार ५३५ इतकी आहे. याच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
यानुसार अनुसूचित जातींसाठी २० जागा (त्यापैकी १० महिला आरक्षित), अनुसूचित जमातींसाठी ३ जागा (त्यापैकी २ महिला आरक्षित) आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी ३४ जागा (त्यापैकी १७ महिला आरक्षित) निश्चित करण्यात आल्या आहेत. या रचनेमुळे सामाजिक समता व सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाला बळ मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, लोकशाही मूल्ये जपत शांततेत आणि पारदर्शकतेने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा निर्धार स्पष्ट दिसून येत आहे.