Home Breaking News अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक प्रचारात शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक प्रचारात शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

83
0

अंजनगाव सुर्जी, अमरावती |
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आज काढण्यात आलेल्या विराट प्रचार रॅलीला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाची गरज असून, हे परिवर्तन केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच शक्य आहे, असे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले.

प्रचार रॅलीदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांनी फुलांची उधळण करत शिवसेना नेत्यांचे जल्लोषात स्वागत केले. लाडक्या बहिणींनी रॅली थांबवून औक्षण केले, तर आबालवृद्धांनी प्रेम, आपुलकी आणि स्नेहाने शिवसेनेच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अंजनगाव सुर्जीतील जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.

यावेळी झालेल्या सभेत बोलताना शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्पृहा डकरे यांच्या कार्याचा आणि सामाजिक वारशाचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्या स्वतः वैद्यकीय डॉक्टर असून समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे. “कुणाला गोळीने आणि कुणाला इंजेक्शनने बरे करायचे, हे डॉक्टरांना जसे माहीत असते, तसेच शहरातील भ्रष्टाचाराच्या किडीवरही त्या प्रभावी उपचार करू शकतात,” असे सांगत मतदारांनी डॉ. स्पृहा डकरे आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

शहराच्या विकासाबाबत ठोस आश्वासने देताना उत्तम दर्जाचे रस्ते, सक्षम पाणीपुरवठा योजना, आधुनिक मैदाने, उद्याने, ग्रंथालये तसेच मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संत रुपालाल महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

स्थानिक विकासाचा रोडमॅप मांडताना पानपिंपरीतील दलाली करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल, संत्रा व केळी प्रक्रियाविषयक उद्योग अंजनगाव सुर्जीत आणले जातील, एमआयडीसी उभारून तरुणांच्या हाताला रोजगार दिला जाईल, असे ठामपणे सांगण्यात आले. शहरातील अर्धवट अवस्थेतील क्रीडा संकुल पूर्ण करण्यासाठी निधी दिला जाईल, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी स्वतंत्र मैदान आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

पाण्याच्या प्रश्नावर बोलताना शहानूर धरणातून १५६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाईपलाईन बदलून दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवून कंपोस्टिंग प्रकल्पाद्वारे कचऱ्याचे शास्त्रीय विघटन केले जाईल, तसेच विजेच्या थकीत बिलांचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.  या रॅलीदरम्यान अमरावती महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र तायडे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी आमदार न्यानेश्वर ढाणे पाटील, उपनेत्या प्रीती बंड, श्याम देशमुख, सुनील डीके, आशिष धर्माळे, संतोष बदरे, नितीन चोखंडे, बाबुराव उंबरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्पृहा डकरे, इतर १४ उमेदवार तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.