मुंबई – शहरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांवर लक्ष केंद्रित करत केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.

या निर्णयांनुसार मुंबईतील लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवास मिळावा, यासाठी स्वयंचलित दरवाजे असलेल्या २३८ नवीन लोकल गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसेच, १२० मेल-एक्सप्रेस गाड्यांची आणि सुमारे ३,२०० उपनगरीय लोकल गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय मुंबईतील महत्त्वपूर्ण स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. बांद्रा येथे ३ पिट लाईनची उभारणी, मुंबई सेंट्रल स्थानकावर २४ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटाचा विस्तार, तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथे डेपोचा विस्तार करण्यात येणार आहे.
वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, विविध रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त फलाटांची उभारणीही प्रस्तावित आहे. जोगेश्वरी येथे दोन, दादर येथे एक, वसई रोड येथे सहा, पनवेल येथे पाच, कलंबोली येथे पाच, परळ येथे सहा आणि कल्याण रेल्वे स्थानकात सहा अतिरिक्त फलाट उभारले जाणार आहेत. यामुळे कल्याण आणि परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी घेण्यात आलेले हे पाऊल मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा ठरणार असून, गर्दी कमी होईल, प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल. केंद्र सरकार आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईकरांच्या हितासाठी घेतलेल्या या दूरदृष्टीच्या निर्णयांचे शहरवासीय कौतुक करत आहेत.