पुणे शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे गुन्हे शाखेने आंदेकर टोळीविरोधात जोरदार आणि निर्णायक कारवाई करत गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली आहे. खंडणी, शस्त्रसाठा आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करत खंडणीविरोधी पथक १ व २ तसेच गुन्हे शाखा युनिट–१ यांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली.

फरासखाना पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. १४९/२०२४ अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) सहित गंभीर कलमान्वये दाखल गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपी गणेश उर्फ सूरज अशोक वडा (वय ३०, रा. मंगळवार पेठ, पुणे) हा तब्बल दोन वर्षांपासून फरार होता. आरोपी सध्या भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार दिलीप गोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली.
दरम्यान, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी खंडणीविरोधी पथक–१ पेट्रोलिंग करत असताना आंदेकर टोळीशी संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. नानापेठ परिसरात कारवाई करत संबंधित बालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे ठेवण्यात आलेल्या शस्त्रांची साखळी थेट आंदेकर टोळीतील गुंडांपर्यंत पोहोचत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर करण्यात आलेल्या झडतीत २ गावठी बनावटीचे पिस्टल, लोखंडी धारदार कुकरी, एअर पिस्टल, रोकड रक्कम, दुचाकी वाहन असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात “हिच आईची इच्छा” नावाच्या चार मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या आंदेकर टोळीशी संबंधित व्यक्तींच्या घराची पंचासमक्ष झडती घेण्यात आली.
या झडतीदरम्यान चांदीचे दागिने, कोट्यवधींची रोकड, आयकर विवरणपत्रे, जमिनी व दुकानांशी संबंधित करारनामे, बांधकाम व्यावसायिकांची कागदपत्रे, पतसंस्थेतील ठेवींच्या पावत्या, सोन्याच्या करारनाम्याची प्रत तसेच महारेरा व इतर मालमत्तेचे कागदपत्रे असा एकूण ३६ लाख ६७ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार, श्री. राजेंद्र मुळीक, श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, आश्विनी जगताप, अजित जाधव, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, राम पारवे, राहुल मखरे तसेच पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या कारवाईमुळे आंदेकर टोळीच्या आर्थिक व गुन्हेगारी नेटवर्कला मोठा धक्का बसला असून, पुणे शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने उभे असल्याचा ठाम संदेश देण्यात आला आहे.




