Home Breaking News गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर झळकली! आशियाई ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत क्षेता कोवेचा सुवर्ण-कांस्य...

गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर झळकली! आशियाई ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत क्षेता कोवेचा सुवर्ण-कांस्य पदकांचा पराक्रम

गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी ऐतिहासिक कामगिरी करत आधी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी क्षेता कोवे हिने दुबई येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समधील ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे जागतिक स्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून क्षेता कोवेचे मनःपूर्वक अभिनंदन करताना म्हटले की, “गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर झळकली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.”
क्षेताच्या यशामागे केवळ तिची प्रतिभा नाही, तर संघर्ष, जिद्द आणि कठोर परिश्रमांची प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करत कुटुंबाचा सांभाळ केला आणि मुलीला सातत्याने प्रोत्साहन दिले. या संघर्षातूनच क्षेताला आत्मविश्वास आणि जिंकण्याची उर्मी मिळाली.
या स्पर्धेत तब्बल १४ देशांतील खेळाडूंशी सामना करत क्षेताने हा विजय मिळवला असून, भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न ती उराशी बाळगून आहे. दुर्गम भागातील असूनही जागतिक स्तरावर यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण क्षेताने घडवले आहे. आज क्षेता कोवेचा हा पराक्रम दुर्गम भागातील असंख्य मुला-मुलींसाठी आशा, प्रेरणा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरत आहे. तिची कामगिरी सांगते की, योग्य संधी, मेहनत आणि चिकाटी असली तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही.