पुणे रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठी आणि कौतुकास्पद कारवाई करत रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या हरियाणातील अंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून ४० लाख रुपये बाजारमूल्याचे २८८ ग्रॅम वजनाचे सोने व हिरे जडीत दागिने हस्तगत करण्यात आले असून, या कारवाईमुळे रेल्वेतील संघटित चोरीच्या घटनांना मोठा आळा बसला आहे. ही कारवाई मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे गु.र.नं. ११७/२०२५ व १२०/२०२५ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासात करण्यात आली. फिर्यादी महिला या गाडी क्रमांक १६५०५ गांधीधाम–बेंगळुरू एक्सप्रेसने सुरत ते मिरज असा प्रवास करत असताना, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मिरज रेल्वे स्टेशनजवळ हा प्रकार घडला.

रेल्वे स्टेशनवर उतरताना मदतीचा बहाणा करत पाच अनोळखी इसमांनी प्रवाशांच्या बॅगा दरवाज्याजवळ नेऊन, नजर चुकवून बॅगमधील सुमारे २४ तोळे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरले. या घटनेनंतर मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) सौ. अश्विनी सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हरियाणातील अंतरराज्यीय टोळीचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात आरोपी विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली विमानतळ प्राधिकरण व दिल्ली क्राईम ब्रँचच्या मदतीने आरोपींना दिल्ली येथे ताब्यात घेण्यात आले.
आरोपींना पुणे येथे आणून अटक करण्यात आली असून, ९ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून मिरज रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या चोरीतील एकूण २८८ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले.
यामध्ये –
🔹 गु.र.नं. ११७/२०२५ : २३३ ग्रॅम सोन्याचे दागिने
🔹 गु.र.नं. १२०/२०२५ : ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने
असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी माहिती देताना पोलीस अधीक्षक सौ. अश्विनी सानप यांनी प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की, रेल्वे स्टेशन जवळ आल्यानंतर अनोळखी व्यक्तींनी मदतीचा बहाणा केल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. विशेषतः महिलांनी आपल्या बॅगा कोणालाही देऊ नयेत.
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा (लोहमार्ग) बाळासाहेब अंतरकर, मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच सपोनि प्रभाकर कापुरे, मसपोनि रूपाली गोरड, पोउपनि सुनिल माने, धनंजय चव्हाण, आर. बी. पाटील यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार व आरपीएफ जवानांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशस्वी कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, संघटित चोरी करणाऱ्या टोळ्यांना जोरदार संदेश देण्यात पुणे रेल्वे पोलिसांना यश आले आहे.




