पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने कडक कारवाई केली जात असून, पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख आणि स्वप्निल घुगे यांना गोपनीय बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे तात्काळ सापळा रचून आरोपीला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भिमराव नरसप्पा मानपाडे (वय २४) असून तो सायनगर, गुलाबनगर, धनकवडी, पुणे येथील रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८८/२०२५ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, या आरोपीविरुद्ध यापूर्वीही स्वारगेट पोलीस स्टेशन येथे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या अटकेमुळे परिसरातील संभाव्य गुन्हेगारी घटना रोखण्यात मोठे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ श्री. संभाजी कदम आणि मा. सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग श्रीमती सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या सूचनांनुसार ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
या धडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, तसेच पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे आणि समीर जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे शहरात बेकायदेशीर शस्त्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, अशा कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ होत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




