पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत.
सध्या पुणे शहरातील बहुतांश भागांत किमान तापमान १० ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. जिल्ह्यातील विविध भागांत तापमानात लक्षणीय फरक पाहायला मिळत असून, हवेली तालुक्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, त्यामुळे हा परिसर जिल्ह्यातील सर्वात थंड ठिकाण ठरला आहे. दुसरीकडे, मगरपट्टा परिसरात किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे जिल्ह्यातील सर्वाधिक आहे.
तापमानात चढउताराचे कारण काय?
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात काही प्रमाणात आर्द्रता वाढली असून, त्यामुळे रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणारी नसल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
पुढील काळाचा अंदाज
हवामान व अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की,
“सध्या रात्रीचे तापमान वाढताना दिसत असले तरी पुढील २४ तासांत उत्तर व मध्य भारतासह महाराष्ट्रात पुन्हा तापमान घसरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित अंदाजानुसार, कमी किमान तापमानाचा काळ पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कायम राहू शकतो.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पश्चिमी चक्रवातांची (Western Disturbances) सतत ये-जा आणि त्यानंतर येणारे थंड उत्तरेकडील वारे यामुळे डिसेंबर अखेर व जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत रात्रीची थंडी जाणवणार आहे.
नागरिकांना खबरदारीचा सल्ला
दीर्घकाळ टिकणाऱ्या थंडीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेत आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी थंडीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.





