Home Breaking News नवी मुंबई मनपाच्या गार्डन विभागातील कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत मनसे आक्रमक; आयुक्त डॉ. कैलास...

नवी मुंबई मनपाच्या गार्डन विभागातील कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत मनसे आक्रमक; आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

74
0
नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागात कोट्यवधी रुपयांच्या खेळणी तसेच ओपन जिम साहित्याच्या खरेदी व दुरुस्ती प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने थेट मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान मनसेने संबंधित घोटाळ्याचे ठोस पुरावे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की, शहरातील उद्याने, खेळणी आणि ओपन जिमसाठी केलेली खरेदी व दुरुस्ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून खर्च मात्र कोट्यवधी रुपयांचा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररुपी पैशांचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
मनसेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणात तत्काळ चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी लवकरच स्वतंत्र चौकशी समिती गठित केली जाईल आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.
या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास गार्डन विभागातील अनेक अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासनातील त्रुटी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर चौकशीला विलंब झाला किंवा कारवाई अपुरी ठरली, तर नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या शिष्टमंडळात मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, शहर सह-सचिव अभिजित देसाई, विभाग अध्यक्ष अमोल आयवाळे, भूषण कोळी तसेच विधी विभाग शहर संघटक ॲड. निलेश बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका मांडली.