संगमनेर | संगमनेर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत ही गेल्या अनेक दशकांपासून तालुक्याच्या आर्थिक विकासाचा कणा ठरत आहे. दि. 14 नोव्हेंबर 1980 रोजी स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीत आजघडीला 150 हून अधिक उद्योग कार्यरत असून, त्यातून 5,000 पेक्षा अधिक कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक युवकांना रोजगाराची संधी देत तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीत या वसाहतीचा मोठा वाटा राहिला आहे.
दि. 15 डिसेंबर रोजी ‘बिझ इंटरनॅशनल’ कंपनीत पहाटे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील काही मूलभूत समस्या समोर आल्या. या पार्श्वभूमीवर तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली. सुरक्षा व्यवस्था, वीजपुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली.
याच अनुषंगाने आज संगमनेर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक वसाहतीच्या भविष्यातील दिशादर्शक निर्णय घेण्यात आले.
बैठकीत खालील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा व निर्णय झाले – 📌 MIDC च्या धर्तीवर संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 📌 पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. 📌 भविष्यात औद्योगिक वसाहतीचा विस्तार करून 25,000 हून अधिक रोजगार निर्मिती कशी साध्य करता येईल, यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
हे निर्णय संगमनेर तालुक्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्योगांना सुरक्षित, सक्षम आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यामागे आहे.
या बैठकीसाठी विशेष तज्ञ म्हणून सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन श्री. नामकरण आवारी साहेब, तसेच संगमनेर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन श्री. के. के. थोरात, उपाध्यक्ष श्री. पियूष भंडारी आणि संचालक मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे संगमनेरच्या औद्योगिक भविष्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.