आंबेगाव | आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील श्री औदुंबरेश्वर देवस्थानच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. या पावन सोहळ्यात सहभागी होत काल्याच्या कीर्तनाचा भक्तिभावाने लाभ घेण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. श्रीपाद महाराज कुडेकर यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी कीर्तनातून नामस्मरणाचे महत्त्व, भक्तीचा मार्ग आणि समाजातील एकोप्याचा संदेश भाविकांना दिला. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक भारावून गेले. याप्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेऊन आत्मिक समाधानाचा अनुभव घेण्यात आला.
श्री औदुंबरेश्वराच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. देवस्थान परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हरिनामाचा गजर सुरू असून, दूरदूरच्या गावांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत.
या भक्तिमय कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व भाविकांशी संवाद साधत, श्री औदुंबरेश्वर देवस्थानच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. देवस्थानच्या विकासासाठी आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी भाविकांनी व्यक्त केलेल्या भावना यावेळी विशेष लक्षवेधी ठरल्या.
अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन, भजन, अभिषेक व महाप्रसाद यांच्या माध्यमातून हा अमृत महोत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. या सोहळ्यामुळे फुलवडे गावात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.