Home Breaking News दिवसा ढवळ्या आळंदीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; मोकळ्या जागेत धाव घेत रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण

दिवसा ढवळ्या आळंदीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; मोकळ्या जागेत धाव घेत रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण

12
0
पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात मंगळवारी दिवसा ढवळ्या बिबट्या मोकळ्या जागेत धावत असल्याचा थरारक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वडगाव रोड परिसरातील हा व्हिडिओ रहिवाशांनी आपल्या घरांच्या गच्चीवरून शूट केला असून, त्यात बिबट्या भरधाव वेगाने पळताना स्पष्टपणे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये काही नागरिक घाबरलेल्या अवस्थेत बिबट्याच्या मागे धावत असल्याचेही दिसत असून, काही क्षणांतच तो बिबट्या थेट वस्तीच्या दिशेने शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. आळंदी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार झाल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेतली असून, संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, एकटे बाहेर पडू नये आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔴 शेतात हल्ला; तरुण जखमी
याच दरम्यान, मंगरूळ परगाव (ता. जुन्नर) येथे आणखी एक गंभीर घटना घडली आहे. शेतात झुडपांमध्ये लपलेल्या बिबट्याने रोहित कापरे या तरुणावर अचानक झडप घातली. त्या वेळी त्याची आई जवळच शेतात काम करत होती. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी संबंधित बिबट्याला ठार करण्याची परवानगी मागितली असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
🔴 जुन्नर विभागात बिबट्यांची संख्या चिंताजनक
वन विभागाच्या माहितीनुसार, जुन्नर वन विभागात १,००० पेक्षा अधिक बिबटे असल्याचा अंदाज आहे. नैसर्गिक भक्ष्यांची कमतरता, जंगल क्षेत्र कमी होणे आणि मोठ्या प्रमाणावर असलेली ऊस शेती यामुळे गेल्या काही महिन्यांत बिबटे सातत्याने मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करत आहेत.
या घटनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे. बिबट्यांचा बंदोबस्त, पिंजरे लावणे, ड्रोनद्वारे शोधमोहीम आणि जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.