पुणे पोलिसांनी ‘ऑपरेशन अलख निरंजन’ या विशेष मोहिमेंतर्गत आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेल्या अमली पदार्थांच्या उच्चस्तरीय रॅकेटचा मोठा पर्दाफाश केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि गोवा येथे एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे ₹3.45 कोटी किमतीचे सिंथेटिक आणि उच्च दर्जाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वराज अनंत भोसले (मुंबई), तुषार चेतन वर्मा (सुसगाव, पुणे), सुमित संतोष देडवाल (ओल्ड सांगवी, पुणे), अक्षय सुखलाल मेहेर (छत्रपती संभाजीनगर) आणि मलेय राजेश डेलिवाला (मुंबई) यांचा समावेश आहे.
खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासातून या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला. गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर तुषार वर्मा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून तो सुमित देडवाल आणि अक्षय मेहेर यांच्याकडून अमली पदार्थांची खरेदी करत असल्याचे स्पष्ट झाले.
DCP सोमय मुंडे यांच्या थेट चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी पिंपरी-चिंचवडमधील दाट लोकवस्तीच्या भागात एक फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे मातीआधारित हायड्रोपोनिक गांजाची लागवड सुरू केली होती. पोलिसांनी हा बेकायदेशीर सेटअप उद्ध्वस्त करून गांजाची झाडे, लागवडीचे साहित्य आणि तयार माल जप्त केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेत पोलिस पथक मुंबई आणि गोवा येथे पोहोचले. तेथे मलेय डेलिवाला या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गांजा, हायड्रोपोनिक OG Kush, चरस, MD ड्रग्स, सायकेडेलिक मशरूम्स, LSD पेपर्स, कॅनाबिस गमीज, MAMD गोळ्या, CBD ऑइल अशा तब्बल नऊ प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
यासोबतच इलेक्ट्रॉनिक वजन काटे, कॅश काउंटिंग मशीन, सीलिंग पिशव्या आणि ड्रग्स विक्रीसाठी वापरले जाणारे इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले आहे. वाढत्या प्रमाणात शहरात पसरत असलेले MD ड्रग्स आणि हायड्रोपोनिक गांजामुळे विशेषतः तरुणाई आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि आर्थिक तपास सुरू DCP सोमय मुंडे यांनी सांगितले की, हे सर्व आरोपी थेट आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी जोडलेले असून, देशांतर्गत तसेच परदेशातील पेडलर नेटवर्कला अमली पदार्थ पुरवत होते. आर्थिक व्यवहारांसाठी हवाला आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील, क्रिप्टो वॉलेट्समधील आणि परकीय चलनातील ₹7.80 लाखांची रक्कम गोठवली आहे.
NDPS कायद्याअंतर्गत सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. संपूर्ण आर्थिक आणि लॉजिस्टिक नेटवर्क उघड करण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. पुणे पोलिसांची ही कारवाई शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.