Home Breaking News “मंदिराखाली खजिना सापडलाय… हवाय का?” आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक; मुंबईत गोल्ड...

“मंदिराखाली खजिना सापडलाय… हवाय का?” आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक; मुंबईत गोल्ड स्कॅमचा धक्कादायक पर्दाफाश

20
0
मुंबई | मुंबईतून फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, मंदिराखाली सापडलेला खजिना स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने चौघांनी एका व्यापाऱ्याला तब्बल 25 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मालाड पश्चिम परिसरात घडली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, खजिना, गुप्त सोने आणि स्वस्तात मिळणाऱ्या मौल्यवान वस्तूंच्या आमिषाने नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढले आहेत, याचेच हे जिवंत उदाहरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
खजिन्याच्या नावाखाली 25 लाखांची लूट
मंदिराखाली उत्खनन करताना दीड कोटींचा खजिना सापडल्याचा बनाव रचत, चार आरोपींनी अवघ्या 25 लाखांत 900 ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवले. बाबूलाल वाघरी, मंगलाराम वाघरी, भंवरलाल वाघरी आणि केसाराम वाघरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी मालाड पश्चिम येथील व्यापारी दिनेश मेहता यांची फसवणूक केली.
 खरे सोनं दाखवून जिंकला विश्वास
26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत बाबूलाल वाघरी याने दिनेश मेहता यांच्याशी ओळख वाढवली. यावेळी त्याने नाशिकमधील एका मंदिराच्या मागे उत्खनन सुरू असताना 900 ग्रॅम सोने सापडल्याचा दावा केला. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने काही खऱ्या सोन्याचे मणी तपासणीसाठी दिले, जे तपासल्यानंतर ते खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मेहता यांचा आरोपींवर पूर्ण विश्वास बसला.
 सोन्याऐवजी दिले पितळ
सोने खरे असल्याची खात्री झाल्यानंतर मेहता यांनी 25 लाख रुपये दिले आणि आरोपींकडून 900 ग्रॅम ‘सोने’ स्वीकारले. मात्र नंतर जेव्हा हे सोने सोनाराकडे तपासणीसाठी नेले, तेव्हा ते सोने नसून पितळ असल्याचे समोर आले. हा धक्का बसताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहता यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
 पोलिसांची जलद कारवाई, मोठा खुलासा
तक्रार मिळताच मालाड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चारही आरोपींना अटक केली. आरोपींकडून 15 लाख रुपयांची रोकड आणि बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुजरातमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्या आहेत का, याचा तपास करत आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना “खजिना सापडल्याचे आमिष, स्वस्तात सोने मिळण्याचे प्रस्ताव किंवा संशयास्पद व्यवहारांपासून सावध राहा”, असे आवाहन केले आहे.