Home Breaking News राजस्थान-चेन्नई उत्सुक, पण जॅकपॉट केकेआरला; कॅमरुन ग्रीन ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा...

राजस्थान-चेन्नई उत्सुक, पण जॅकपॉट केकेआरला; कॅमरुन ग्रीन ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू – मिळाले तब्बल ₹25.20 कोटी

70
0
दुबई | आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावाला दुबईमध्ये आज जोरदार सुरुवात झाली आणि पहिल्याच सत्रात क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं ते ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीन याने. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या ग्रीनवर अनेक संघांनी बोलींचा पाऊस पाडला, मात्र अखेर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने बाजी मारत त्याला ₹25.20 कोटींना खरेदी केले.
ग्रीनची मूळ किंमत केवळ ₹2 कोटी होती. मात्र लिलावात त्याच्यासाठी झालेल्या जबरदस्त चुरशीमुळे तो आपल्या मूळ किंमतीच्या जवळपास 13 पट किमतीला विकला गेला. यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, या लिलावातील आतापर्यंतचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला आहे.
कॅमरुन ग्रीनसाठी लिलावात रंगली तिरंगी-चौरंगी लढत. सुरुवातीला मुंबई इंडियन्सने बोलीची सुरुवात केली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत उतरले. राजस्थान रॉयल्सने ग्रीनसाठी अंतिम बोली ₹13.40 कोटींपर्यंत नेली, मात्र कोलकाताने आक्रमक पवित्रा घेत त्यांना मागे टाकले. राजस्थान माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) देखील मैदानात उतरली आणि थेट ₹25 कोटींची बोली लावली. अखेर केकेआरने ₹25.20 कोटींची निर्णायक बोली लावत ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
आयपीएल 2026 हा कॅमरुन ग्रीनचा बीसीसीआयच्या टी-20 लीगमधील चौथा हंगाम असणार आहे. त्याने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आयपीएल 2024 आणि 2025 मध्ये तो आरसीबीकडून खेळला, मात्र मिनी-लिलावापूर्वी आरसीबीने त्याला रिलीज केले. त्यानंतर आता केकेआरने त्याच्यावर विश्वास दाखवत मोठी गुंतवणूक केली आहे.
 कॅमरुन ग्रीनचा आयपीएल रेकॉर्ड
कॅमरुन ग्रीनने आतापर्यंत 29 आयपीएल सामने खेळले असून 28 डावांमध्ये 707 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाज म्हणून त्याने 16 विकेट्सही घेतल्या आहेत.
  • मुंबई इंडियन्सकडून: 16 सामने, 452 धावा, 6 विकेट्स
  • आरसीबीकडून: 13 सामने, 255 धावा, 10 विकेट्स
ग्रीनच्या नावावर आयपीएलमधील एक शानदार शतकही आहे, जे त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना झळकावले होते. त्याची फलंदाजी-गोलंदाजीतील अष्टपैलू क्षमता आणि मोठ्या सामन्यांतील कामगिरी लक्षात घेता, केकेआरसाठी तो गेम-चेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या लिलावामुळे आयपीएल 2026 आधीच रंगतदार झाला असून, केकेआरने कॅमरुन ग्रीनवर लावलेला हा जॅकपॉट पुढील हंगामात किती फायद्याचा ठरतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.