Home Breaking News निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले

निवडणूक आचारसंहिता लागू; शहरात महापालिकेची धडक कारवाई, ४,८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवले

89
0
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून, १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ४,८१९ अनधिकृत व नियमबाह्य राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने ही व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारतींचा परिसर, भिंती, पूल, विद्युत खांब आणि मोक्याच्या जागांवर लावलेले राजकीय फ्लेक्स, होर्डिंग, किऑस्क, स्टिकर्स, ध्वज, चिन्हे व जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी युद्धपातळीवर मोहीम
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व आदेशांचे पालन करताना निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता आणि समतोल राखणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला अनुचित फायदा होऊ नये किंवा नागरिकांवर दबाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
 राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन
महापालिकेच्या वतीने सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही साहित्य पुढील काळात लावू नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
 प्रशासनाची स्पष्ट भूमिका
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की,
“निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी कारवाई केली आहे.”
तर उपायुक्त राजेश आगळे यांनी स्पष्ट केले की,
“आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत, यासाठी ही कारवाई सुरू आहे. पुढील काळातही ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.”
 नागरिकांनीही घ्यावी जबाबदारी
महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, अनधिकृत राजकीय जाहिराती आढळल्यास तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, जेणेकरून निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेला हातभार लागेल.