Home Breaking News ठाणे शहराच्या सौंदर्यात ऐतिहासिक भर; खाडीकिनारी २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच...

ठाणे शहराच्या सौंदर्यात ऐतिहासिक भर; खाडीकिनारी २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवरसह भव्य विकास प्रकल्पांचे सादरीकरण

62
0
मुंबई | ठाणे प्रतिनिधी
ठाणे शहराला जागतिक दर्जाचे आधुनिक स्वरूप देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे आज सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणारा २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकल्पांमुळे ठाणे शहराचा नकाशाच बदलणार असून पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ठाणे खाडीकिनारी तब्बल ५० एकर क्षेत्रफळात उभारण्यात येणारा व्हिविंग टॉवर हा भारतातील सर्वांत उंच टॉवर ठरणार आहे. या टॉवरमधून ठाणे शहर, मुंबई खाडी, नैसर्गिक सौंदर्य आणि शहरी विकासाचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी नागरिक व पर्यटकांना मिळणार आहे. हा प्रकल्प ठाण्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याशिवाय, कासारवडवली येथे भव्य कन्व्हेन्शन सेंटर, तर कोलशेत परिसरात २५ एकरमध्ये आधुनिक टाऊन पार्क उभारण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना विरंगुळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्यावसायिक परिषदांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
ठाण्याच्या सांस्कृतिक व नैसर्गिक ओळखीला जपण्यासाठी आगरी-कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क व ॲडव्हेंचर पार्क विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजन व शिक्षणाची उत्तम साधने उपलब्ध होतील.
क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठे प्राधान्य देण्यात आले असून, १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहर क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र म्हणून ओळखले जाईल.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ठाणे महापालिकेकडून मीरा-भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडणारा १८.४ किलोमीटर लांबीचा ‘आनंदवन हरित पट्टा’ विकसित केला जाणार आहे. हा हरित पट्टा शहराच्या हवामानात सुधारणा करताना जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत करणार आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे ठाणे शहराच्या सौंदर्यात, पायाभूत सुविधांमध्ये आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सादरीकरणाच्या वेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सौरभ राव उपस्थित होते. ठाणे शहराला ‘भविष्याचे स्मार्ट आणि ग्रीन सिटी’ बनवण्याच्या दिशेने हे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.