पुणे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पर्वती पोलीस स्टेशनकडून सातत्याने प्रभावी कारवाया केल्या जात असून, याचाच एक भाग म्हणून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
दि. १३/१२/२०२५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे व त्यांचे पथक पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख व स्वप्निल घुगे यांना गोपनीय बातमी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्ती बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची खात्री होताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत कारवाई केली.
या कारवाईत भिमराव नरसप्पा मानपाडे (वय २४ वर्षे), रा. साईनगर, गुलाबनगर, धनकवडी, पुणे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीदरम्यान एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८८/२०२५ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही स्वारगेट पोलीस स्टेशन येथे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ श्री. संभाजी कदम, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग श्रीमती सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या सूचनांनुसार पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, तसेच पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सदाम शेख, स्वप्निल घुगे, सूर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे व समीर जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुणे शहरात बेकायदेशीर शस्त्रसाठा व गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिसांचा कठोर व शून्य सहनशीलतेचा दृष्टीकोन कायम असून, अशा कारवाया पुढेही अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.