पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ याला अत्यंत शिताफीने अटक केली आहे. स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी
दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता, हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात फिर्यादी हे आपल्या रिक्षामध्ये बसून नातेवाईकांची वाट पाहत असताना, रिक्षातील साऊंड बंद करण्यावरून वाद झाला. या वादातून गणेश आष्टुळ व त्याच्या साथीदारांनी लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करून फिर्यादीस गंभीर जखमी केले.
या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती; मात्र मुख्य आरोपी गणेश आष्टुळ फरार झाला होता.
गुप्त बातमी व अचूक कारवाई
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार विष्णू सुतार व विठ्ठल चोरमले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी जनता वसाहत, शंकर मंदिराजवळ, पर्वती परिसरात लपून वावरत आहे.
त्यानुसार मा. वरिष्ठांच्या आदेशाने
👮♂️ सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक,
👮♂️ पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख,
आणि पोलिस पथकाने सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव गणेश दीपक आष्टुळ (वय २१), रा. एस.आर.ए. सोसायटी, शिंदेवस्ती, हडपसर असे सांगितले व गुन्ह्याची कबुली दिली. त्याला दाखल गुन्ह्यात विधिवत अटक करण्यात आली आहे.
पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी
या आरोपीविरोधात यापूर्वीही हडपसर पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं. १६४४/२०२३ अन्वये मारहाण, शिवीगाळ, धमकी व जमावाच्या गुन्ह्यांचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई
मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील,
मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर,
तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.





