Home Breaking News कोंबडी पुलावर धडाडीची कारवाई! देशी बनावटी पिस्तूल बाळगणारा इसम अटक; गुन्हे शाखा...

कोंबडी पुलावर धडाडीची कारवाई! देशी बनावटी पिस्तूल बाळगणारा इसम अटक; गुन्हे शाखा युनिट १ ची मोठी कामगिरी

35
0
पुणे शहरातील मंगळवार पेठ परिसरात गुन्हे रोखण्यासाठी युनिट ०१ गुन्हे शाखेचे अधिकारी सतत गस्त घालत असताना, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या दक्षतेमुळे एक गंभीर गुन्हा रोखण्यात पोलीस दलाला यश मिळाले. कोंबडी पुल, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाजवळ एका संशयित इसमाकडे देशी बनावटी पिस्टल असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्काळ पथक नेमण्यात आले व गुन्हे शाखा युनिट १ च्या संपूर्ण टीमने परिस्थितीची पडताळणी करून कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तातडीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वर्णनातील इसम पथकाच्या हाती लागला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव रमजान उर्फ टिपू आदम पटेल (वय ३३ वर्षे, रा. भाजी बाजार, शिरूर) असे सांगितले.
अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेला ₹५०,००० किंमतीचे एक गावठी पिस्तूल, तर खिशात ₹१,००० मूल्याचे एक जिवंत काडतूस आढळून आले. प्राथमिक तपासातून हा इसम काही गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने सार्वजनिक ठिकाणी थांबला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदर प्रकरणात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २१५/२०२५ आर्म्स अ‍ॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
या उल्लेखनीय व धाडसी कामगिरीचे श्रेय
  • मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
  • मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे,
  • मा. सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे ०१) श्री. विजय कुंभार
यांच्या मार्गदर्शनाला जाते.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांच्या सूचनांनुसार पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे आणि त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार
हेमंत पेरणे, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयूर भोसले, सिद्धेश्वर वाघमारे, उमेश मठपती, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, सदेश काकडे, ज्योती मुल्का, रुक्साना नदाफ व मयुरी जाधव
यांनी संयुक्तपणे केली.
गुन्हे शाखेच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक सुरक्षेबाबत पोलिसांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.