पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-6 ने मोठी धडक कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹18 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 8 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी अचानक दिलेल्या या धाडीने जुगारींच्या पायाखालची वाळू सरकली. अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, पत्त्यांचे संच, टेबल, खुर्च्या आणि इलेक्ट्रॉनिक साधने पोलिसांनी जप्त केली.
या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे नोंदवले गेले असून आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 305, 331(3)(4), 3(5) तसेच IPC कलम 37(1), 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ₹17,81,000 रोख रक्कम आणि ₹41,400 किमतीचा साहित्य असा मिळून ₹18,22,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मिलिंद मोहिते, आणि गुन्हे शाखा युनिट-6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक संजय पवार, तसेच पोलीस कर्मचारी गणेश साळवे, योगेश वाघ, शरद पोळ, शिरीष गावडे आणि सुनील मुठे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. वारंवार मिळणाऱ्या तक्रारींनंतर गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता आणि अचूकता सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे.
🔹 पोलिसांचा इशारा : “शहरात बेकायदेशीर जुगार, हुक्का बार किंवा अवैध धंदे चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा ठिकाणी छापे मारून कारवाई सुरू राहील.”