मुंबई, ४ नोव्हेंबर २०२५ – मुंबई वाहतूक विभागात आजचा दिवस विशेष ठरला! एका भावनिक आणि सन्माननीय ‘पिपिंग सेरेमनी’त पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल यांना उच्च पदांवर बढती देण्यात आली. या समारंभाला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. प्रियंका नर्णवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यात बढती मिळालेल्या पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग उत्साहवर्धक होता. अनेक पोलिस जवानांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. कुटुंबीयांच्या हस्ते खांद्यावर नवी तारे बसवण्याचा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.
डॉ. नर्णवरे यांनी यावेळी जवानांचे अभिनंदन करताना सांगितले, “ही बढती केवळ सेवेतल्या वरिष्ठतेचे नव्हे, तर नागरिक सेवेतील निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यदक्षतेचे प्रतीक आहे.”
मुंबई वाहतूक पोलिस दल नेहमीच शहराच्या सुचारू वाहतूक व्यवस्थेचे कणा म्हणून काम करत आले आहे. अशा बढती कार्यक्रमांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.
या समारंभात वाहतूक विभागातील अधिकारी, कर्मचारी, तसेच बढती मिळालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रितपणे छायाचित्रे घेत आनंद व्यक्त केला.