पुणे: पुणे शहरातील परिमंडळ-१ अंतर्गत विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पोलिस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले यांनी संवाद साधत सुरक्षा, वाहतूक, आणि व्यावसायिक अडचणींवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. ही बैठक फर्ग्युसन कॉलेज कंपाउंडमधील अॅम्पी थिएटर येथे पार पडली.
या बैठकीत खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर, विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी, किराणा-भुसार व्यापारी, ज्वेलर्स, टिंबर मार्केट व्यापारी आणि पथारी संघटनांचे प्रतिनिधी अशा सुमारे ४५ लोकांनी सहभाग घेतला. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी मांडल्या.
श्री. रावले यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत अनेक ठोस उपाय जाहीर केले. अनाधिकृत पथाऱ्यांवर कारवाई, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई, तसेच परप्रांतीय अनधिकृत व्यवसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुळशीबाग परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापण्याच्या घटना थांबविण्यासाठी विश्रामबाग आणि फरासखाना पोलिसांनी पाहणी करून योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच महिला चोरीप्रकरणे रोखण्यासाठी गर्दीच्या दिवशी महिला पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे.
श्री. रावले यांनी सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले. सोने-हिरे वाहतूक करताना पोलिसांना माहिती देऊन सुरक्षा मागावी, असेही त्यांनी सुचविले. शिवाय, पोलिस विभाग दरमहा व्यापारी संघटनांसोबत बैठक घेऊन अडचणींवर तत्काळ उपाययोजना करेल, असे त्यांनी आश्वासन दिले.
🔹 मुख्य मुद्दे:
-
अनधिकृत पथाऱ्यांवर कारवाई
-
चुकीच्या पार्किंगविरोधात मोहीम
-
महिला पोलिसांची गस्त वाढविणे
-
व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन
-
दरमहा व्यापारी-पोलिस बैठक आयोजित





