पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत कुशलतेने काम करत दुचाकी चोरी प्रकरणातील ६७ वर्षीय सराईत आरोपी अरुण बाबुराव देशमुख (रा. सुखसागरनगर, पुणे) याला अटक केली असून, त्याच्याकडून एक चोरीस गेलेली दुचाकी, एक रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे आणि ३० बनावट चाव्या असा एकूण ₹६५,००० किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७०/२०२५ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर आणि त्यांच्या पथकाने कसून शोध घेत आरोपीचा माग काढला. माहिती मिळाली की आरोपी बिबवेवाडीच्या दिशेने चोरीची अॅक्टीवा दुचाकी घेऊन जात आहे.
तातडीने सापळा रचून पोलिसांनी आरोपीला २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात उघड झाले की आरोपी हा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार आहे.
त्याच्या घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना एका बॅगमध्ये रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे आणि ३० बनावट चाव्या आढळून आल्या. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून, आरोपीच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ ५), सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले (हडपसर विभाग), आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. या मोहिमेत पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, तसेच पोलीस अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, दडस आणि गिरी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
ही कारवाई लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या दक्षतेचे आणि गुन्हेगारीविरोधातील बांधिलकीचे द्योतक ठरली आहे. या प्रकरणामुळे परिसरात पोलीसांबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.