मुंबईच्या पवई भागात बुधवारी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 17 लहान मुलांना ओलीस ठेवत, त्यांना मारण्याची धमकी देत व्हिडिओद्वारे समाजमाध्यमांवर भीतीचं वातावरण निर्माण केलं. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत शौर्य, संयम आणि बुद्धिमत्तेने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आरोपीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
ही घटना पाहताच परिसरात मोठी गर्दी जमली, अनेकांनी आरए स्टुडिओकडे धाव घेतली. पोलिसांनी बाथरूमची खिडकी फोडून आत प्रवेश करून मुलांना वाचवले. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, मुंबईत ओलीस ठेवण्याची ही पहिलीच घटना नाही. 2010 साली अंधेरीत 14 वर्षीय हिमानी नावाच्या मुलीला सेवानिवृत्त सीमा शुल्क अधिकारी हरीश मारोलिया यांनी ओलीस ठेवले होते. इमारतीच्या वादातून उद्भवलेल्या या प्रकरणात आरोपीने मुलीची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या केली होती.
तसेच, 2008 मध्ये बिहारमधील राहुल राजने अंधेरीतून कुर्ल्याकडे जाणाऱ्या BEST च्या बसमधील प्रवाशांना ओलीस ठेवले होते. त्यावेळी त्याने राज ठाकरे यांना मारण्याचा इशारा दिला होता आणि पोलिस कारवाईत त्याचा मृत्यू झाला होता.
मुंबईसारख्या महानगरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. प्रशासन आणि पोलीस दलाने अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कता ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.