पुण्यातील सुप्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्ट (PTR No. E-1634) या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोल कलोटी यांनी पूर्वी दिलेला “Status Quo” (स्थिती कायम ठेवावी) हा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या आदेशाची मुदत आता ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली, तर प्रत्युत्तरदार ट्रस्टच्या वतीने अॅड. इशान कोल्हटकर, तसेच गोकले लँडमार्क एलएलपी या संस्थेच्या वतीने अॅड. एन. एस. आनंद यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान दोन्ही प्रत्युत्तरदारांकडून ‘स्टेटस क्वो’ आदेश कायम ठेवण्यास कोणतीही हरकत नोंदविण्यात आली नाही.
धर्मादाय आयुक्तांनी दोन्ही पक्षकारांना ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लेखी उत्तर सादर करण्यासाठी वेळ दिली असून, पुढील सुनावणी देखील त्याच दिवशी घेण्यात येणार आहे. त्या दिवशी या प्रकरणातील महत्त्वाचा निर्णय अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
सेठ हिराचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्ट हा पुण्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ट्रस्ट असून, त्याच्या संपत्ती व व्यवस्थापनाबाबत काही वाद निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा मुद्दा धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करण्यात आला होता.
या ट्रस्टच्या अंतर्गत शैक्षणिक, सामाजिक आणि दानशूर उपक्रम राबवले जातात, त्यामुळे या प्रकरणाकडे पुणेकरांसह सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागले आहे. न्यायप्रक्रियेच्या या टप्प्यावर “स्टेटस क्वो” कायम राहिल्याने ट्रस्टच्या संपत्ती किंवा व्यवस्थापनात कोणताही बदल सध्या करता येणार नाही.
या निर्णयामुळे दोन्ही बाजूंना आपले दावे अधिक स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळणार असून, पुढील सुनावणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.