पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दक्षतेचा परिचय देत समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत सराईत चोरट्याला अटक करून चोरी गेलेला सोन्याचा व रोकडीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घडली. फिर्यादी दिवाळीच्या पूजेच्या तयारीसाठी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड काढण्यासाठी गेले असता, कपाटाचा ड्रॉवर उचकटलेला आणि त्यातील ₹५०,००० रोख रक्कम, दोन तोळ्यांची सोन्याची चैन आणि दोन सोन्याच्या अंगठ्या (एक तोळा) गायब असल्याचे त्यांनी पाहिले.
फिर्यादींच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३५/२०२५ भा.दं.वि. कलम ३३१(३), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर लक्ष केंद्रीत केले.
सखोल तपासानंतर पोलिसांनी शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९, रा. छत्रपती संभाजीनगर, जोशी प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) या आरोपीस अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, या आरोपीवर यापूर्वीही फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडून पोलिसांनी २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या (१० ग्रॅम), तसेच ६.९०० ग्रॅम वजनाची आणखी एक अंगठी असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस या आरोपीकडून अन्य गुन्ह्यांबाबतही चौकशी करत आहेत.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्री. कृषिकेश रावले, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) सौ. अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे आणि पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
समर्थ पोलीस ठाण्याच्या या तात्काळ कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढली आहे. दिवाळीच्या काळातही पोलिस दल सतत सजग आणि सक्रिय असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.