Home Breaking News बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी! जबरी चोरीतील तीन आरोपी अटकेत – ३ लाखांहून...

बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी! जबरी चोरीतील तीन आरोपी अटकेत – ३ लाखांहून अधिक किमतीचे १९ मोबाईल फोन हस्तगत

पुणे – बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करत ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे शहरातील विविध भागांतील आठ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
साधुवासवानी चौकात फिर्यादी थांबलेले असताना, आरोपींनी दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसका मारून चोरून नेल्याच्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३०५/२०२५ भा.दं.वि. कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते.
तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे, तपास पथकातील प्रदीप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी आरोपी कोंढवा परिसरात असल्याचे निश्चित केले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली –
१) सोहेल बादशाह खान (वय २०, रा. शिवनेरी नगर, कोंढवा)
२) आयान झाकीर शहा (वय २१, रा. शिवनेरी नगर, कोंढवा)
३) फरहान वसीम शेख (वय २०, रा. शिवनेरी नगर, कोंढवा)
या आरोपींपैकी दोन जणांना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे एकूण १९ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त मालाची एकूण किंमत ₹३,२३,००० इतकी आहे.
या यशस्वी कारवाईमुळे बंडगार्डन, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड आणि स्वारगेट या पोलीस ठाण्यांतील जबरी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस या आरोपींकडून इतर चोरीच्या प्रकरणांचा तपास सुरू ठेवत आहेत.
ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) सौ. संगिता आल्फान्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, अवधुत जमदाडे, निलेश पालवे, प्रविण पाडाळे यांनी परिश्रम घेतले.
पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.