पुणे: अत्यंत कुशल तपास आणि तातडीच्या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलिस स्टेशनने ३५ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल नंदुरबारमधून हस्तगत करत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात आला आहे.
ही घटना मा. भगवती ट्रान्सपोर्ट कंपनी, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याकडे घडली होती. कंपनीच्या कंटेनर ट्रक (क्र. MH-12-TV-1024) मध्ये हायर कंपनीचे १२० फ्रिज कटकेवाडी येथील वेअरहाऊसमधून लोड करून गुजरातमधील शिल्पा इलेक्ट्रॉनिक्स, राजकोट येथे पोहोचविण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी हा कंटेनर ठरलेल्या ठिकाणी न पोहोचल्याने आणि ट्रकचालकाचा फोन बंद लागत असल्याने संशय निर्माण झाला.
जीपीएस लोकेशननुसार कंटेनर सूरत येथे स्थिर असल्याचे दिसून आले. मात्र, कंपनीने दुसरा ट्रक चालक पाठवला असता तेथे ट्रक सापडला नाही. परिणामी ट्रकचालकाने ट्रक आणि मालासह पलायन केल्याचा संशय पक्का झाला. कंपनीचे मॅनेजर यांनी याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला (गु.र.नं. ३८६/२०२५, भा.दं.वि. कलम ३१६ (३), ३(५)).
त्यानंतर पोउपनि अर्जुन बेंदगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने गुन्ह्याच्या तपासासाठी तातडीने हालचाल सुरू केली. चौकशीत समजले की, चोरीचा कंटेनर ट्रक नंदुरबारमधील आर.के. पेट्रोलियम येथे बेवारस अवस्थेत उभा आहे. तपास पथकाने तात्काळ नंदुरबार गाठत कंटेनर ट्रक जप्त केला.
यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. निसार अहमद इसाक खान (वय ३५, रा. शास्त्री मार्केट, मंगल बाजार, नंदुरबार) हा कंटेनर चालकाचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेले हायर कंपनीचे १२० फ्रिज, किंमत ₹३५,७९,६६०/-, एका खेडेगावातील घरातून जप्त केले. ही मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि अर्जुन बेंदगुडे हे करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, सौ. प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, तसेच अंमलदार कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, किरण पलांडे, अमोल ढोणे व सुधीर शिवले यांनी महत्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे केवळ अपहाराचा माल परत मिळाला नाही, तर गुन्हेगारांच्या मनात भीती आणि कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.