Home Breaking News वाघोलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून – पुणे पोलिसांची जलद कारवाई; आरोपी पती...

वाघोलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून – पुणे पोलिसांची जलद कारवाई; आरोपी पती अटकेत

33
0
पुणे : शहरातील वाघोली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका निर्दयी पतीने आपल्या पत्नीचा निर्दयपणे खून केला. ही घटना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी लाडबा वस्ती, केसनंद (ता. हवेली, जि. पुणे) येथे घडली. आरोपीचे नाव बिराप्पा शंकर खांडेकर (वय ५० वर्षे) असे असून त्याने आपल्या पत्नीवर लाकडी दांडक्याने वार करत गंभीर दुखापत केली होती.
घटनेनंतर जखमी महिलेवर उपचार सुरू असताना तिचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५१/२०२५ नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीला दाखल गुन्ह्यात भा.दं.वि. कलम १०३, १०९, ३५१(२), ३५२ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र महिलेच्या मृत्यूनंतर कलम १०३ प्रमाणे गंभीर स्वरूपाची वाढ करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले होते. पोलीस अंमलदार अशोक शेळके, पांडुरंग माने आणि महादेव कुंभार यांनी कसोशीने शोध घेत अखेर आरोपीला कासारवाडी, पुणे परिसरातून जेरबंद केले. त्यांनी सापळा रचून अत्यंत शिताफीने ही कारवाई केली.
संपूर्ण कारवाई पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे यांनी केले.
या संपूर्ण ऑपरेशनसाठी वरिष्ठ अधिकारी मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) श्री. सोमय मुंडे, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
या गुन्ह्याने पुन्हा एकदा समाजात घरगुती वाद आणि संशयातून होणाऱ्या हिंसक घटनांबद्दल चिंता निर्माण केली आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला कायद्याच्या कचाट्यात आणण्यात यश आले आहे.