पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी आणखी एक मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत ६४,००० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली असून, ३ किलो १९२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ११ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि अन्य पथकातील अधिकारी हे परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना, त्यांना ऐश्वर्या बँक्वेट हॉलच्या मागील बाजूने विवा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, आंबेगाव बु. येथे एक संशयास्पद इसम दिसला.
पोलिसांनी तत्काळ त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्या जवळील पोत्यात गांजाचा साठा आढळून आला. चौकशीअंती त्याने आपले नाव शिवम तेजराव धोरण (वय २४ वर्षे, रा. जी. व्ही. सेव्हन सोसायटी, माउंट व्हिव्ह बिल्डिंग, आंबेगाव बु., पुणे) असे सांगितले.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ४६५/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही संपूर्ण कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. मिलींद मोहीते, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार कार्यरत पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे आणि निलेश खैरमोडे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा पुणे शहर पोलिसांच्या दक्षतेचे आणि अंमली पदार्थांविरोधातील कठोर भूमिकेचे दर्शन घडले आहे. पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.