Home Breaking News अजित पवारांवर दादागिरीचे आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांवर दादागिरीचे आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

51
0
सोलापूरमध्ये घडलेल्या एका घटनेने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अंजली कृष्णा यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून “दादागिरी” केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री पवारांवर होत आहे.
या घटनेला वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी आणि समाजमाध्यमांवरील वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अजित पवारांचे समर्थन केले तर काहींनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करून अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
घटना कशी घडली?
माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसीलदार आणि डीवायएसपी अंजली कृष्णा यांनी पोलिसांसह धाड टाकली. कारवाई सुरू असतानाच स्थानिक कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला आणि थेट अधिकाऱ्यांशी बोलण्याची व्यवस्था केली. त्यावेळी अजित पवार यांनी “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, कारवाई थांबवा आणि तिथून निघा” असा आदेश दिला.
परंतु अंजली कृष्णा यांनी “आपणच उपमुख्यमंत्री आहात हे कसे पटणार?” असे सांगत ओळख पटवण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्याची विनंती केली. यावर अजित पवार भडकले आणि “तुमचं डेरिंग खूप वाढलं आहे, तुमच्यावर कारवाई करू शकतो,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते.
राजकीय वादळ
व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी अजित पवारांना निशाण्यावर घेतले आहे. “एका जबाबदार उपमुख्यमंत्र्याने महिला अधिकाऱ्यांशी धमकीच्या स्वरात बोलणे शोभणारे नाही,” अशी टीका होत आहे. दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक मात्र त्यांच्या परखडपणाचे समर्थन करत, “कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे नेत्यांचे कर्तव्य आहे,” असा युक्तिवाद करत आहेत.
सध्या परिस्थिती
या घटनेवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून #AjitPawar आणि #AnjaliKrishna हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. या प्रकरणाची सत्यता आणि पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.