पुणे : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या मोठ्या समस्येत गणला जाणारा कात्रज-कोंढवा रस्ता अखेर वेगाने पूर्णत्वाकडे जाणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महापालिकेने ठोस पाऊल उचलले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेले तब्बल ४७० कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहेत. यामुळे जागामालकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया वेगाने होऊन रस्त्याचे काम गतीमान होणार आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मूळतः ८४ मीटरचा आराखडा होता. मात्र खर्च कमी करण्यासाठी आता तो ५० मीटरपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. या टप्प्यात जवळपास ९४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूसंपादन होणार असून, त्यापैकी ४६ हजार चौरस मीटर जागा आधीच संपादित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देखील १४० कोटी रुपये महापालिकेला मिळाले असून, उर्वरित निधी जागामालकांना नुकसानभरपाई स्वरूपात दिला जाणार आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळा, आयटी पार्क, व्यापारी व्यवहार तसेच नागरिकांच्या रोजच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास दक्षिण पुण्यातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.
मात्र, जागामालकांकडून योग्य ती भरपाई मिळाल्याशिवाय जागा न देण्याची अट सातत्याने पुढे केली जाते. काहीजण सुरुवातीला सहमती दर्शवूनही प्रत्यक्षात आल्यावर माघार घेत असल्याने काम अडखळते. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने थेट नुकसानभरपाईचा निधी तयार ठेवत प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, “कात्रज-कोंढवा रस्ता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भूसंपादनासाठी आवश्यक निधी जमा केला असून, पुढील काळात कामाला वेग येईल.”
या निर्णयामुळे पुणेकरांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार असून, कात्रज-कोंढवा रस्ता पुढील एका वर्षात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.