Home Breaking News चिंतामणी ते निलगिरी रस्ता दत्तक घेण्याचा ऐतिहासिक निर्णय: अजित पवारांच्या आवाहनाला चिंतामणी...

चिंतामणी ते निलगिरी रस्ता दत्तक घेण्याचा ऐतिहासिक निर्णय: अजित पवारांच्या आवाहनाला चिंतामणी ज्ञानपीठाचा सकारात्मक प्रतिसाद, दक्षिण पुण्यात विकासाची नवीन दिशा

53
0
पुणे (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसहभागातून विकास करण्याच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, चिंतामणी ज्ञानपीठ आणि ऐश्वर्या कट्टा यांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने आंबेगाव परिसरातील चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा महत्त्वाचा रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दक्षिण पुण्यातील विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप, डॉ. विजय थोरात आणि सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात पार पडले. या वेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेऊन नागरिकांमध्ये जागृतीचे संदेश दिले. या उपक्रमाच्या यशासाठी महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे अधिकारी आणि चिंतामणी ज्ञानपीठाचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच पिंपरी-चिंचवड येथे केलेल्या भाषणात जनतेच्या सहभागाशिवाय विकास अपूर्ण राहील असे मत व्यक्त केले होते. “प्रशासन एकट्याने विकास करू शकत नाही. वेगाने विकसित होत असलेल्या महानगरपालिकांमध्ये विकासासाठी सर्वांनीच सहभागी व्हावे,” असे त्यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष आप्पा रेणुसे यांनी हा रस्ता दत्तक घेण्याचे जाहीर केले.
गेली सहा वर्षे तोरणागडाचे दायित्व चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने पार पाडले जात आहे. या सामाजिक जबाबदारीच्या धर्तीवरच आता रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आप्पा रेणुसे म्हणाले, “आम्ही फक्त तोरणागडाचे नव्हे तर समाजाच्या विकासाचे दायित्व घेत आहोत. भविष्यात आम्ही आणखी पाच रस्ते दत्तक घेण्याची योजना आखली आहे.” या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त माधव जगताप म्हणाले, “हा पुणे शहरातला दुसरा आणि दक्षिण पुण्यातला पहिला असा उपक्रम आहे. याला आम्ही पायलट प्रोजेक्ट मानत आहोत. प्रशासन आणि जनता यांच्या संयुक्त विद्यमाने या भागाचा विकास निश्चितपणे होईल.” त्यांनी महानगरपालिकेच्या सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
उपायुक्त डॉ. विजय थोरात यांनी सांगितले, “वेगाने विकसित होणाऱ्या या भागात नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.” त्यांनी या प्रकल्पाचे लवकरात लवकर पूर्णत्व येण्यासाठी महानगरपालिकेची संपूर्ण मदत देण्याचे वचन दिले.
सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांनी या पुढाकाराचे स्वागत करत म्हणाल्या, “हा अतिशय विधायक पुढाकार आहे. यामुळे इतरांनाही असे काम करण्याची प्रेरणा मिळेल. सर्वांनी यात आवर्जून सहभागी व्हावे.” त्यांनी या उपक्रमातून नागरिकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण होईल असे विश्वास व्यक्त केला. दक्षिण पुण्यातील या विशिष्ट उपक्रमाचे स्वागत करत नागरिकांनी सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमांमुळे शहराचा चेहरा बदलेल. विशेषतः आंबेगाव परिसरातील रहिवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. रस्त्याच्या दुरुस्ती, स्वच्छता आणि सुंदरीकरणासाठी आता नागरिकांनाही जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे त्यांचे मत आहे.
या प्रसंगी विलासराव भणगे, सर्जेराव शिळीमकर, शंकर कडू, सचिन डिंबळे, युवराज रेणुसे, मधुकर कोंढरे, दिलीप जगताप, पांडुरंग मरगजे, सोमनाथ शेडगे, मंगेश साळुंखे आणि आप्पा रेणुसे यांच्या मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या विकासात योगदान देण्याचे वचन दिले. अजितदादा पवार यांच्या आवाहनाला मिळालेला हा प्रतिसाद दाखवून देतो की जनतेचा सहभाग मिळाल्यास विकासाची गती वेगळीच होऊ शकते. चिंतामणी ज्ञानपीठाचा हा पुढाकार इतर संस्थांसाठी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.