Home Breaking News मुंबई रेल्वे स्थानकांवर मराठ्यांचे वादळ, प्रत्येक ठिकाणी एकच आवाज – आरक्षण हक्काचा!

मुंबई रेल्वे स्थानकांवर मराठ्यांचे वादळ, प्रत्येक ठिकाणी एकच आवाज – आरक्षण हक्काचा!

60
0
मुंबई : राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे धाव घेत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली असून, डबाबंद गाड्यांमध्येही मराठ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. प्रत्येक स्थानकावर “आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच!” या घोषणांचा गजर दुमदुमत आहे.
छोट्या गावांपासून ते शहरांपर्यंत, हजारो कार्यकर्ते कुटुंबांसह रेल्वेतून मोर्चाकडे रवाना होत आहेत. मुंबईतील दादर, सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मानखुर्द या प्रमुख स्थानकांवर मराठा समाजाची लाट उसळली आहे. महिलांची व मुलांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.
समाजातील प्रत्येक घटक या लढ्यात एकत्र आला आहे. कुणी डोक्यावर भगवा फडकवत आहे, कुणी हातात बॅनर घेऊन “जय जिजाऊ, जय शिवराय” च्या घोषणा देतोय. अनेकांनी आपल्या अंगावर ‘आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे लिहिलेले टी-शर्ट घातले आहेत.
या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनालाही अतिरिक्त गाड्या चालवाव्या लागल्या असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तरीही, मराठा समाजाचा उत्साह कमी झालेला नाही. उलट लोकांच्या डोळ्यांत फक्त एकच ध्येय दिसते – आरक्षण मिळवायचंच!
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चर्चा रंगली आहे. सरकारवर दबाव वाढत असून, राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसते. मराठ्यांचा हा ऐतिहासिक आवाज आता थेट मंत्रालयाच्या दारात पोहोचणार आहे.