पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. दररोज हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातो. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) उभारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची दुसरी चाचणी 27 ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या चाचणीत माण डेपो ते बालेवाडी स्टेडियम (स्टेशन क्र. 10) पर्यंत मेट्रो धावली आणि प्रवाशांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रथमच हिंजवडीहून बाहेर पडलेली मेट्रो पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता ताणली गेली होती. या मार्गावरील काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे अंतिम लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला जमीन भूसंपादनातील अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे कामाला विलंब झाला होता. तरीही आज या 23.3 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाच्या 87 टक्के कामाला यश मिळाले असून, वाहतूक कोंडीवर तोडगा मिळण्याची आशा पुणेकरांनी व्यक्त केली आहे.
या मार्गावर एकूण 23 स्थानके असतील. हिंजवडी आयटी पार्कमध्ये सध्या एक लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याने, मेट्रो सुरू झाल्यावर प्रवासाचा वेळ लक्षणीय प्रमाणात वाचणार आहे. दररोज कामावर जाणे-येणे करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो म्हणजे वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेळेची बचत ठरणार आहे.
हा प्रकल्प भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ या नावाने तो उभारला जात आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी या कामाला सुरुवात झाली होती. सध्या चार मेट्रो गाड्या उपलब्ध असून, प्रत्येक गाडीत सुमारे 1,000 प्रवासी बसू शकतील. गाड्या 80 किमी प्रतितास वेगाने धावणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, केवळ मेट्रो सुरू करणे पुरेसे नाही, तर प्रवाशांना सोयीस्कर लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीसाठी ई-रिक्शा, फीडर बस, रिक्षा अशा सुविधा उपलब्ध करून देणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे कोंडी आणि प्रदूषण कायम राहू शकते. सुरक्षित, सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाची खरी अनुभूती मिळण्यासाठी या अंतिम टप्प्यातील सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. या प्रकल्पामुळे पुण्याचा प्रवासाचा वेग वाढणारच नाही, तर रोजगार, विकास आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे. पुणेकर आता उत्सुकतेने मेट्रोचे नियमित संचालन सुरू होण्याची वाट पाहत आहेत.