मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की “मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळल्याशिवाय मी इथून जाणार नाही”. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या उपोषणाकडे लागले आहे.
दरम्यान, या चळवळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दगाफटका होत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. खासदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटसोबत गृहविभागाशी संबंधित एक पत्रदेखील शेअर केले आहे.
या पत्रात आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली बंद करण्याचे आदेश पोलिसांच्या सूचनेनुसार देण्यात आले असल्याचे दिसून येते. यावर रोहित पवारांनी सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ली सुरु ठेवणे आवश्यक आहे. मात्र सरकारने उलट लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे दगाफटकेचे उदाहरण आहे.”
आंदोलकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मुलभूत सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्याचीही टीका रोहित पवारांनी केली. हजारो आंदोलक जमले असूनही मूलभूत सुविधांचा पुरवठा न करणे ही आंदोलकांच्या आरोग्याशी आणि प्रतिष्ठेशी खेळणारी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.
“सरकार अशा प्रकारे आंदोलकांना त्रास देऊन दडपशाही करणार असेल तर ही मोठी चूक ठरेल. गृहमंत्र्यांनी हे विसरू नये की, दुसऱ्यांदा चूक होऊ नये हीच लोकांची अपेक्षा आहे,” असेही रोहित पवारांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये नवे राजकीय वादळ उठले असून सरकारची भूमिका अधिकच कठीण झाली आहे.