Home Breaking News वानवडी पोलिसांची थरारक कामगिरी – २४ तासांत गुन्हा उघडकीस; ५.८७ लाखांचे दागिने...

वानवडी पोलिसांची थरारक कामगिरी – २४ तासांत गुन्हा उघडकीस; ५.८७ लाखांचे दागिने हस्तगत

58
0
पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या तपासपथकाने अतिशय कुशल तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल ₹५,८७,०५० किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने हस्तगत करून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी बळकट केला आहे.
 प्रकरण असे की, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सोपानबाग येथे राहणारे रिटायर्ड विंग कमांडर आणि त्यांची पत्नी हे धावपळीत व घाबरलेल्या अवस्थेत वानवडी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांना भेटून आपल्या घरातून तब्बल ५.८७ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची माहिती दिली.
तातडीने फिर्याद नोंदवत गु.र.नं. ३४३/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक आदमाने यांनी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
 तपासादरम्यान संशय घरकाम करणाऱ्या दोन महिलांकडे गेला. सखोल चौकशीत एक मोलकरीण अचानक दागिने सोनाराकडे गहाण ठेवण्यासाठी आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने छापा टाकून सुधा राजेश चौगुले (वय ३५, रा. बोराटे वस्ती, बी.टी. कवडे रोड, घोरपडीगाव, पुणे) हिला अटक करण्यात आली.
 चौकशीत चौगुले हिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिने दागिने लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून तब्बल ₹५,८३,०५० किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे चोरलेल्या मालाची संपूर्ण परतफेड करण्यात यश आले.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग श्री. मनोज पाटील, मा. उपआयुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार डोके यांच्या देखरेखीखाली पार पडली.
या घटनेमुळे वानवडी परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व समाधानाची भावना निर्माण झाली असून, पोलिसांची कार्यक्षमता व तत्परता याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.