Home Breaking News पुण्यात धार्मिक सौहार्दाचे दर्शन : ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलली, गणेश...

पुण्यात धार्मिक सौहार्दाचे दर्शन : ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलली, गणेश विसर्जन मिरवणुकीला दिला प्राधान्य

73
0
पुणे – पुणे हे नेहमीच धार्मिक सौहार्द, सामाजिक एकात्मता आणि सामंजस्याचे उत्तम उदाहरण राहिले आहे. याचेच आणखी एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. यंदा ईद ए मिलाद (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) ५ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होणार होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेली गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. दोन्ही मोठ्या मिरवणुका एकाच काळात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीस सिरत कमिटी, विविध मुस्लिम मंडळांचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर पुणे शहर पोलीसांच्या विनंतीस मान देत मुस्लिम बांधवांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ५ सप्टेंबरला होणारी ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलून ८ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून, दोन्ही समाजाच्या संयमामुळे पुणे हे “धर्मनिरपेक्षतेचे आणि सामंजस्याचे” उत्तम उदाहरण ठरले असल्याचे सांगितले.
पुणेकरांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, गणेश विसर्जन मिरवणुकीला कोणताही अडथळा येणार नाही आणि मुस्लिम बांधवांना देखील ८ सप्टेंबरला शांततेत आणि उत्साहात आपला धार्मिक उत्सव साजरा करता येणार आहे. यामुळे पुणे शहर पुन्हा एकदा सामंजस्य आणि ऐक्याच्या पायावर उभे असल्याचे सिद्ध झाले आहे.