Home Breaking News नाशिक-रायगडवर चर्चा सुरू, पण भंडाऱ्यात पालकमंत्रिपदाची उलथापालथ; पंकज भोयर यांची नवीन जबाबदारी

नाशिक-रायगडवर चर्चा सुरू, पण भंडाऱ्यात पालकमंत्रिपदाची उलथापालथ; पंकज भोयर यांची नवीन जबाबदारी

133
0
भंडारा : महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा रंगत असतानाच भाजपने अनपेक्षित पाऊल टाकत भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदात मोठा बदल केला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय सावकारे यांच्या कार्यप्रणालीबद्दल स्थानिक स्तरावर नाराजी होती. ते जिल्ह्यात नियमित हजेरी लावत नसल्याने विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहिल्या होत्या, असा आरोप वारंवार केला जात होता. सावकारे हे फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि जिल्हा नियोजन बैठकींनाच उपस्थित राहतात, अशी तक्रार स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. यामुळे जिल्ह्यात ‘स्थानिक’ पालकमंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती.
याच पार्श्वभूमीवर सरकारने सावकारे यांना हटवून विदर्भातील पंकज भोयर यांच्यावर विश्वास दाखवला. वर्धा जिल्ह्याचे रहिवासी असलेले भोयर यांच्यासाठी भंडारा भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्याने त्यांना या जबाबदारीसाठी योग्य मानण्यात आले आहे.
पालकमंत्री म्हणून नियुक्तीनंतर पंकज भोयर म्हणाले :
“संजय सावकारे यांचंही काम चांगलं होतं. परंतु भौगोलिक अडचणींमुळे त्यांना हा जिल्हा दूर पडला असावा. मी विदर्भातील असल्याने माझ्यावर ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. महायुती सरकारमध्ये असलेल्या तीनही घटकपक्षांशी समन्वय साधून मी काम करेन. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो योजनांची अंमलबजावणी आम्ही वर्धा जिल्ह्यात केली आहे, त्याच पद्धतीने त्या योजना आता भंडाऱ्यात राबवणार आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.”
या निर्णयामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक समस्या सोडवण्यासाठी आणि विकास गतीमान करण्यासाठी आता पंकज भोयर कडून मोठ्या अपेक्षा आहेत. नाशिक-रायगडवरून चर्चा, पण भंडाऱ्यात पालकमंत्रिपदाची उलथापालथ; पंकज भोयर यांची नियुक्ती, सावकारेंची हकालपट्टी