Home Breaking News भोसरीत “जागर सुवासिनीचा.. खेळ मंगळागौरीचा” कार्यक्रम जल्लोषात पार; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

भोसरीत “जागर सुवासिनीचा.. खेळ मंगळागौरीचा” कार्यक्रम जल्लोषात पार; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

45
0
भोसरी : भोसरी प्राधिकरणातील सेक्टर १२ येथील रत्नदुर्ग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या वतीने आयोजित “जागर सुवासिनीचा.. खेळ मंगळागौरीचा” हा अनोखा सांस्कृतिक उपक्रम रविवारी (दि. २४) मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. महिलांच्या पारंपरिक खेळ, नृत्य, गाणी, हास्य आणि उत्साहाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका तृप्ती शिर्के यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लावून उपस्थितांचे मनोमन जिंकले. त्यांच्या गायनाने महिलांना उत्सवाचा खरा आनंद अनुभवायला मिळाला. सुरुवातीला पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच ‘सजना’ चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती मोरे या देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. त्यामुळे महिला वर्गात मोठा उत्साह होता, परंतु पावसामुळे काहीसा हिरमोड झाला.
तरीदेखील, महिलांनी गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमासाठी केलेल्या तयारीमुळे उत्सव रद्द न करता कमी वेळात पुन्हा नियोजन करून तो यशस्वी करण्यात आला. रविवारी सायंकाळी पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने उत्सवाला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात महिलांच्या सहभागाने संपूर्ण परिसरात उत्सवाचे रंग पसरले.
मोठ्या संख्येने महिला हजेरी लावून या उपक्रमात सहभागी झाल्या. विविध पारंपरिक खेळांपासून गीत-नृत्याच्या कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हा कार्यक्रम महिला सबलीकरण आणि सांस्कृतिक जतन यांचा संगम ठरला. भोसरी सेक्टर १२ मध्ये “जागर सुवासिनीचा.. खेळ मंगळागौरीचा” कार्यक्रम उत्साहात; पावसाचे आव्हान पार करून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग