मुंबई : महाराष्ट्रात खाण उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी Epiroc AB कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हेलिना हेडब्लॉम यांची विशेष भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील खाण क्षेत्र, अत्याधुनिक खाण उपकरणे निर्मिती, तसेच तंत्रज्ञान विकास याबाबत सविस्तर चर्चा झाली.
एपीरॉक ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी असून, त्यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आपले कार्य सुरू ठेवले आहे. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक संधी, गुंतवणुकीचे अनुकूल वातावरण आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलती व प्रोत्साहन योजनांची माहिती दिली.
हेलिना हेडब्लॉम यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राची प्रगती व सरकारच्या धोरणांचे कौतुक करत राज्यात खाण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे महाराष्ट्रात रोजगारनिर्मिती वाढण्याबरोबरच खाण उपकरणांच्या उत्पादनात नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी एपीरॉक कंपनीच्या पुढील विस्तारासाठी शुभेच्छा देत सांगितले की, “महाराष्ट्र सरकार नेहमीच जागतिक स्तरावरील उद्योगांना सहकार्य करत आले आहे. एपीरॉकसारख्या कंपन्यांच्या उपस्थितीमुळे राज्यातील औद्योगिक प्रगती अधिक वेगाने होईल.”
ही बैठक महाराष्ट्रातील खाण उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नवीन युगाची सुरुवात ठरणारी ठरली असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रात खाण व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एपीरॉक कंपनीसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक; औद्योगिक प्रगतीला मिळणार वेग