Home Breaking News गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपक वापरास ७ दिवसांची परवानगी – जिल्हाधिकारी डूडी यांचा आदेश

गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपक वापरास ७ दिवसांची परवानगी – जिल्हाधिकारी डूडी यांचा आदेश

130
0
पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. राज्य शासनाने याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर) आणि ध्वनिवर्धक वापरासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी विशेष परवानगी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या काळात एकूण ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास परवानगी दिली जाईल. शनिवार ३० ऑगस्टपासून शनिवार ६ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट दिवसांसाठी ही सूट लागू असेल. यामुळे मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, भजन, कीर्तन यांसारखे धार्मिक व सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे सादर करता येणार आहेत.
फक्त गणेशोत्सवच नव्हे तर नवरात्रीसाठी १ व २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी २५ डिसेंबर आणि वर्षअखेरसाठी ३१ डिसेंबर या दिवशीही ध्वनिक्षेपक वापरास सूट मिळणार आहे. शिवाय, कोणत्याही विशेष महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे, ज्यासाठी संबंधित मंडळांना आवश्यक परवानगी घेऊन ध्वनीवर्धक वापरण्याची संधी मिळेल.
तथापि, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० आणि सुधारित नियम २०१७ च्या अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. झोनिंगनुसार ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणे मान्य राहणार नाही. तसेच ही सूट शांतता क्षेत्रांमध्ये लागू होणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे गणेश मंडळांना उत्सवात जोश आणि आनंदाने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यास मुभा मिळाली असली तरी, नियमांचे पालन करणे आणि आवाज मर्यादेत ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी राहणार आहे.