मुंबई : महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार, निवृत्तीवेतनधारक आणि गणेशभक्तांना दुहेरी दिलासा दिला आहे. सणाच्या आनंदात कोणतीही आर्थिक किंवा प्रवासातील अडचण येऊ नये, यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
पगार पाच दिवस आधीच ऑगस्ट महिन्याचा पगार 1 सप्टेंबरऐवजी 26 ऑगस्ट रोजीच खात्यात जमा होणार आहे. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवातील घरगुती तयारी, गणपतीची प्रतिष्ठापना, पाहुणचार आणि विविध खर्चासाठी आर्थिक हातभार लागणार असून, या निर्णयामुळे नोकरदारांचा उत्साह दुप्पट झाला आहे.
कोकणगावकऱ्यांसाठी टोलमाफी गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला सुलभ करण्यासाठी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 दरम्यान मुंबई-गोवा व मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील सर्व टोल नाके मोफत राहणार आहेत. खासकरून एसटी बसेस आणि खासगी वाहनांना “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन पास”च्या आधारे टोलमाफी मिळणार आहे.
या निर्णयांमुळे कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुलभ होईल, आर्थिक ताण हलका होईल आणि बाप्पाच्या आगमनाचा उत्सव अधिक जोशात साजरा करता येईल. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे खऱ्या अर्थाने गणेशभक्तांसाठी गोड बातमी ठरली आहे.