मुंबई : मान्सून म्हणजे मुंबईकरांसाठी नेहमीच कसोटीचा काळ. रस्त्यांवरील पाणी, ठप्प झालेली लोकल सेवा आणि तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले प्रवासी हा दरवर्षीचा चित्रपट जणू नित्याचा झाला आहे. याच काळात मुंबईकरांना सर्वाधिक भीती वाटते ती मिठी नदीची. तिचे नाव गोड असले तरी इतिहास मात्र वेगळाच सांगतो.
सतत वाढणारा जलस्तर आणि स्थलांतरित नागरिक सध्या मिठी नदीचा जलस्तर 3.9 मीटरपर्यंत पोहोचला आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कुर्ल्यातील क्रांती नगरमधून तब्बल 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परिस्थितीवर लक्ष ठेवले असून सर्व विभागांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
2005 चा काळा दिवस – जेव्हा मिठीने रौद्ररूप दाखवले 18 किमी लांबीची ही नदी पवईपासून माहिम खाडीत मिळते. 26 जुलै 2005 रोजी झालेल्या विक्रमी पावसाने मुंबई थरारली होती. या पुरामुळे 1000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, 14,000 घरे उद्ध्वस्त, तसेच 52 लोकल गाड्या, 4000 टॅक्सी, 37,000 ऑटो रिक्षा आणि 900 बसचे नुकसान झाले. मुंबईच्या इतिहासातील हा सर्वात भीषण दिवस म्हणून तो आजही स्मरणात आहे.
65 कोटींचा घोटाळा – सफाई काम फक्त कागदावर 2005 नंतर बीएमसीने नदीतील गाळ काढण्यासाठी प्रकल्प हाती घेतला. मात्र, चौकशीत धक्कादायक प्रकार उघडकीस आले. बनावट बिले, काल्पनिक कामे आणि भ्रष्टाचाराच्या जाळ्यातून 65 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. पोलिस, ईओडब्ल्यू आणि नंतर ईडीने तपास सुरू केला. या प्रकरणात अनेक बीएमसी अधिकारी, मध्यस्थ आणि कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
बॉलीवूडची एंट्री – डिनो मोरियाचे नाव चर्चेत या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाच्या कंपनीचे नावही आले. ईओडब्ल्यूने त्याची तब्बल 8 तास चौकशी केली. कॉल रेकॉर्ड्स आणि कागदपत्रांमधून ही बाब समोर आली होती.
‘मिठी’ नावामागची कहाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या वेढ्यात मुंबईत वाहणाऱ्या या नदीचे पाणी गोड असल्याने स्थानिकांनी तिला “मिठी नदी” हे नाव दिले. मात्र, आज या नावाच्या मागे आपत्ती, भीती आणि भ्रष्टाचाराच्या आठवणी दडलेल्या आहेत.
मिठी नदीवर उपाययोजना होणार की पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार? हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकराला पडला आहे.