पिंपरी चिंचवड | उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि जलद अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पुढे जात पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) अवघ्या दोन वर्षांत असा विकास साधला आहे, जो इतर अनेक विद्यापीठांना साध्य करण्यासाठी दोन दशके लागली. याच प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पीसीयू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी) तसेच मानवी संसाधन विकास केंद्र (एचआरडीसी) यांच्यात सोमवारी (दि. ४) सामंजस्य करार झाला.
या करारावर पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि यूजीसी – एचआरडीसी संचालक प्रा. डॉ. राजेश कुमार दुबे यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. या वेळी पीसीयूचे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, वरिष्ठ प्राध्यापक व प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते.
कराराचे महत्त्व या सामंजस्य करारामुळे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, बहुविषयक शैक्षणिक सहकार्य, आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत अशा उच्च दर्जाच्या शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळेल. आता यूजीसी-एचआरडीसी प्रायोजित राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम पीसीयूमध्ये आयोजित केले जातील. यामुळे विविध शाखांतील प्राध्यापक एकत्र येऊन संवाद साधतील, नवनवीन अध्यापन पद्धतींवर चर्चा करतील, आणि आंतरशाखीय अभ्यास व प्रशिक्षणाच्या नव्या संकल्पना राबवल्या जातील.
दृष्टीकोन आणि गौरवोद्गार डॉ. राजेश कुमार दुबे यांनी या कराराचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “आजचे शिक्षक हे केवळ अध्यापन करणारे नसून राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्यामध्ये विशाल दृष्टीकोन असला पाहिजे, स्थानिक समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निराकरण करण्याची क्षमता असली पाहिजे. एनईपी अंतर्गत संयुक्त पदवी आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रम समजून घेणे आणि राबविणे ही काळाची गरज आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “इतर विद्यापीठांना २० वर्षांत मिळालेली प्रगती पीसीयूने अवघ्या दोन वर्षांत साध्य केली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”
पीसीयूचे शैक्षणिक तत्त्वज्ञान पीसीईटी आणि पीसीयू शैक्षणिक गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि सहकार्य या मूल्यांवर विश्वास ठेवतात, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले. “हा करार म्हणजे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे,” असे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, नवोपक्रमशीलता, ‘मेक इन इंडिया’ सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत अशी शैक्षणिक रचना ही आमची बांधिलकी आहे.”
प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी पीसीयूच्या संशोधन प्रकल्प, अभ्यासक्रम नवकल्पना आणि भविष्यातील शैक्षणिक योजना यांची माहिती दिली.
मार्गदर्शकांचा हातभार पीसीयूचे कुलपती तसेच पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या नेतृत्वामुळे पीसीयू सर्वांगीण विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे.