चाकण | चाकण-तळेगाव परिसरातील सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पहाटे थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली. रात्री उशिरा बीड जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून पहाटेच पुण्यात दाखल झालेले अजित पवार यांनी भोसरीपासून चाकणपर्यंतच्या वाहतूक व्यवस्थेची सखोल तपासणी केली.
पहाटे सहा वाजताच त्यांनी भोसरीतील भारत माता चौक परिसराला भेट देऊन तेथील वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहिली. त्यानंतर तळेगाव चौकात थांबून चाकणमधील मुख्य मार्ग, औद्योगिक वसाहत परिसर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचे निरीक्षण केले. पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यामध्ये पर्यायी मार्ग तयार करणे, अवजड वाहनांच्या हालचालीसाठी वेगळ्या वेळा निश्चित करणे, सिग्नल व्यवस्थेतील बदल, तसेच वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याचे निर्देश समाविष्ट होते.
चाकण औद्योगिक वसाहतीमुळे दररोज सुमारे एक लाखाहून अधिक अवजड वाहने आणि इतर वाहने या भागातून ये-जा करतात. यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नाही तर नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम होत आहे. कामगारांच्या वेळेवर पोहचण्यापासून रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यात येणारा अडथळा, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय आणि मालवाहतुकीतील विलंब या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती तसेच स्थानिक नागरिक, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर आणि शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आजच्या पाहणी दौऱ्यानंतर अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढणे ही प्राथमिकता असून लवकरच ठोस पावले उचलली जातील.”
यावेळी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अभाव जाणवला.
अजित पवार यांच्या या पहाटेच्या दौऱ्यामुळे चाकण आणि तळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असली तरी आता प्रत्यक्षात उपाययोजना कधी आणि कशा राबवल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.