पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या चमूने एक मोठा गुन्हा टाळण्यात यश मिळवलं आहे. दि. २९ जुलै २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भवानी पेठ परिसरात एक युवक विनापरवाना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ पावले उचलून कारवाई केली आणि आरोपीस अटक केली.
सदर युवकाचं नाव जितु रवि मंडलिक (वय २०, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) असे आहे. तो भवानी पेठेतील जुना मोटर स्टँडजवळ मटण मार्केटजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली असता, त्याच्याकडे ४०,००० रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि ६,००० रुपये किंमतीची सहा जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपीने पिस्तुल पँटच्या आत कंबरेजवळ लपवून ठेवले होते.
या प्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९७/२०२५ नुसार आर्म्स अॅक्ट ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार: वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश साबळे, शुभम देसाई, उमेश मठपती.
ही कारवाई केवळ पोलिसांच्या सतर्कतेचे द्योतक नसून, भविष्यात घडू शकणाऱ्या एखाद्या गंभीर गुन्ह्याला प्रतिबंध घालणारी ठरली आहे.