पुणे, ३० जुलै २०२५: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विश्वासघातकी चालकाने मालकाच्या कामासाठी आणलेली पगाराची रक्कम चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी चाणाक्ष तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ठाणे) याला अखेर ठाण्यातून अटक केली आहे.
काय घडलं होतं? फिर्यादीच्या गाडीतून मजुरांचा पगार देण्यासाठी १५ लाखांहून अधिक रोख रक्कम आणली जात होती. आरोपी सलमान पठाण हा त्या गाडीचा चालक होता. त्याने रक्कम लांबवून गाडीचाही अपहऱण केला आणि काही वेळातच गायब झाला. या प्रकरणी ३०६ कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तांत्रिक तपास महत्त्वाचा ठरला: चतुर आरोपीने स्वतःचा मोबाईल फोन बंद ठेवल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, पोलिस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक विश्लेषणातून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. आरोपी सतत ठिकाणं बदलत होता – मिरज, सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, ठाणे – या भागांत लपून फिरत होता.
तो स्वतःचा फोन वापरत नसून, रस्त्यावरील अनोळखी लोक, हॉटेल वेटर्स, कॅब व रिक्षा चालक यांच्या फोनवरून आपल्या नातेवाइकांशी संपर्क करत होता. त्यामुळे त्याच्या ट्रेसिंगला अडथळा येत होता.
अटक आणि मुद्देमाल जप्ती: मुंब्रा येथील शिळडायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याच्या मित्राच्या मदतीने ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ₹१५,०६,४२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि चोरीस गेलेली चारचाकी गाडीचा समावेश आहे.
पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी: ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सपोनि अमित शेटे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलिसांनी अतुलनीय मेहनतीने ही कारवाई यशस्वी केली.
नागरिकांमध्ये समाधान: या कारवाईमुळे नागरिकांत समाधानाची भावना आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे विश्वासघातकी आरोपीला गजाआड करण्यास यश आले असून, सहकाऱ्यांना विश्वासार्ह न्याय मिळाल्याचे प्रतित होत आहे.