Home Breaking News हडपसर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ११ महागड्या गाड्या...

हडपसर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ११ महागड्या गाड्या जप्त

पुणे – हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणत तीन सराईत आरोपी आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये सुमारे १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात बुलेट, ड्युक, एफझेड, स्प्लेंडर आणि अ‍ॅक्टीवा अशा एकूण ११ दुचाकींचा समावेश आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही योजना आखून २० ते २७ जुलै २०२५ दरम्यान धडक कारवाई केली.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे:
अमन उर्फ परश्या भोला तिवारी (वय १९) – रा. माळवाडी, हडपसर
मोहम्मद अशरफअली अजमेरी (वय २०) – रा. खराडी, पुणे
प्रणव गणेश जमादार (वय २०) – रा. वडगावशेरी, पुणे
दोन विधीसंघर्षित बालक
या टोळीने पुणे शहरातील हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, विमाननगर, विश्रामबाग आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीचे गुन्हे केले होते. एकट्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या टोळीने दुचाकी चोरी करण्यासाठी विशेष पद्धतीने लॉक तोडण्याची उपकरणे वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वाहनांची विक्री करून पैसे मिळवणे, किंवा त्यांचा वापर इतर गुन्ह्यांमध्ये करणे हा यामागील उद्देश होता.
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले, आणि पोलीस निरीक्षक श्री. निलेश जगदाळे व अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी – अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. पोलिसांकडून या टोळीची पार्श्वभूमी, इतर गुन्हेगारी संबंध आणि नेटवर्कबाबत सखोल चौकशी सुरू आहे.